देशसेवेचा अभिमान !
अहिल्यानगरचा महेश जंजिरे सी आर पी एफ मध्ये बनलाय असिस्टंट कमांडंट...
नगर प्रतिनिधी. ( 27.एप्रिल. 2026.) : अहिल्यानगरच्या मातीचा आणखी एक हिरो देशसेवेसाठी सज्ज झाला आहे.महेश ईश्वर जंजिरे यांनी यूपीएससी परीक्षा उत्तीर्ण करून सी आर पी एफ मध्ये थेट असिस्टंट कमांडंट म्हणून दमदार एंट्री घेतली आहे.
दिल्लीतील सीआरपीएफ ॲकॅडमीमध्ये खडतर प्रशिक्षण पूर्ण केल्यानंतर आता त्यांची नियुक्ती जम्मू-काश्मीरमधील संवेदनशील कुपवाडा सेक्टरमध्ये झाली आहे. म्हणजेच थेट देशाच्या अंतर्गत सुरक्षेच्या फ्रंटलाईनवर ते उभे राहणार आहेत.l
या अभिमानास्पद यशाबद्दल महेश जंजिरे यांचा अहिल्यानगर जिल्हयाच्या वतीने लोकप्रिय आमदार संग्राम भैय्या जगताप यांच्या हस्ते सत्कार करण्यात आला.यावेळी आमदारांनी महेश जंजिरे यांना पुढील वाटचालीसाठी शुभेच्छा देत त्यांच्या यशाचा गौरव केला.
महेश जंजिरे यांनीही तरुणांसाठी एक पॉवरफुल मेसेज दिला. सीआरपीएफ ही देशातील सर्वात मोठी पोलीस कॅडर संस्था असून, देशाच्या अंतर्गत सुरक्षेसाठी कायम तत्पर आहे, असे जंजिरे म्हणाले. इच्छुक व जिद्द असलेल्या युवकांना यूपीएससी आणि स्पर्धा परीक्षांसाठी मोफत मार्गदर्शन करण्याचा निर्धार त्यांनी व्यक्त केला.
याच कार्यक्रमात त्यांच्या महेश जंजिरे यांच्या पत्नी वास्तुविशारद काजल जंजिरे यांचाही सन्मान करण्यात आला. छत्रपती संभाजी महाराज यांच्या पराक्रमाची साक्ष देणाऱ्या अहिल्यानगर जिल्ह्यातील श्रीगोंदा तालुक्यातील पेडगाव येथील बहादुरगड या किल्ल्याच्या सांस्कृतिक आणि ऐतिहासिक वारशावर आधारित अभ्यासावर त्यांनी केलेल्या संशोधनाला दिल्ली येथील आंतरराष्ट्रीय संस्थेकडून प्रशस्तीपत्र मिळाले असून, ते संग्राम जगताप यांच्या हस्ते काजल जंजिरे यांना प्रदान करण्यात आले.
अहिल्यानगरचे प्रथम महापौर भगवान फुलसौंदर, बांधकाम व्यावसायिक ईश्वर जंजिरे, बचत गटाच्या नेत्या सुनीता जंजिरे, अॅड. सविता बोठेपाटील, यश बोठेपाटील यांच्यासह इतर मान्यवर यावेळी उपस्थित होते.
एकीकडे देशसेवा… आणि दुसरीकडे संशोधनातून संस्कृती जपण्याचा प्रयत्न करीत असल्याने जंजिरे कुटुंब आज अनेक तरुणांसाठी एक प्रेरणादायी उदाहरण ठरत आहे.

