मकर संक्रात पर्वकाळात श्री.मोहटादेवीस लघुरुद्राभिषेक पूजा संपन्न.
नगर, प्रतिनिधी. (14.जानेवारी. 2026.) : मकर संक्रात पर्वकाळामध्ये पहाटे ५.०० वा. श्री.मोहटादेवीस लघुरुद्राभिषेक तीर्थजलाने करण्यात येवून महापूजा करण्यात आली. मकर संक्रांतीच्या शुभ मुहूर्तावर सूर्य धनू राशीतून मकर राशीत प्रवेश करतो, या पर्वकाळाचे विशेष महत्त्व लक्षात घेऊन दरवर्षी प्रमाणे श्री मोहटादेवी देवस्थानच्या वतीने देवीला लघुरुद्राभिषेक आयोजन करण्यात आले होते.
पहाटे ब्राह्ममुहूर्तावर वेदोक्त मंत्रांच्या जयघोषात या पूजेला सुरुवात झाली. तीळाचे विविध अलंकार, विविध पुष्पांचे हार, तीळाच्या लाडवांचा नैवेद्य समर्पण करून देवीची आरती करून भावीक भक्तांना तीळगुळ देवून प्रेमभाव हा जीवनात महत्वाचा आहे, असा संदेश दिला. यावेळी भारत राष्ट्र समृध्द व्हावे व जणमाणसामध्ये ऐक्य, प्रेमभाव निर्माण व्हावा असा संकल्प करुन देवीस प्रार्थना करण्यात आली. लघुरुद्राभिषेक पुजेमुळे श्री मोहटादेवी गडावर चैतन्याचे वातावरण निर्माण झाले असून, 'आई राजा उदो उदो' च्या जयघोषाने श्री मोहटादेवी गड दुमदुमून गेला होता.
मकर संक्रात पर्वकाळामध्ये हजारो महिला आपल्या बरोबर हळंदी, कुंकु, शेतातील धान्य, फळे घेवून मनोभावे देवीस वानवसा अर्पण करतात. वानवसा अर्पण करणेकरिता देवस्थान विश्वस्त मंडळाने देवीचा चांदीचा मुखवटा ठेवून महिला भावीकांसाठी विशेष व्यवस्था करण्यात आलेली होती. आलेल्या महिला व सर्व भावीकांना देवस्थानकडुन चहापाणी व महाप्रसादाचे आयोजन करण्यात आलेले होते. यामुळे सर्व भावीकांमध्ये आनंददायी वातावरण निर्माण झालेले होते. मंदिर व परिसरामध्ये महिला भावीकांची विशेष गर्दीमुळे परिसर गजबजून गेला होता, यावेळी आगळीवेळी शोभा पाहवयास मिळाली.
कार्यक्रमाचे पौराहित्य वे. भूषण साकरे, वे. भास्कर देशपांडे, व अहिल्यानगर येथील ११ पुरोहित आमंत्रित करण्यात आलेले होते. यावेळी देवस्थानचे मुख्य कार्यकारी सुरेश भणगे, जनसंपर्क अधिकारी भिमराव खाडे व कर्मचारी, ग्रामस्थ, भावीक भक्त मोठ्या संख्येने उपस्थित होते.
