पदमश्री डॉ.विठ्ठलराव विखे पाटील यांच्या १२५ व्या जयंतीनिमित्त गुणवंत विद्यार्थ्यांचा सन्मान सोहळा संपन्न..!
अहिल्यानगर,प्रतिनिधी. (30.ऑगस्ट. 2025.) : सहकार चळवळीचे जनक, शेतकऱ्यांच्या शैक्षणिक आणि सामाजिक प्रगतीस आयुष्य वाहिलेल्या पदमश्री डॉ. विठ्ठलराव विखे पाटील यांच्या १२५ व्या जयंतीनिमित्त गुणवंत विद्यार्थ्यांचा सन्मान सोहळा डॉ. ए. पी. जे. अब्दुल कलाम ऑडिटोरियम, मेडिकल कॅम्पस, अहिल्यानगर येथे भव्यदिव्य वातावरणात पार पडला.
कार्यक्रमाचे उद्घाटन के. ई. एल. अभिमत विद्यापीठ, बेळगाव (कर्नाटक) चे कुलगुरू मा. प्रा. डॉ. नितीन एम. गंगणे यांच्या हस्ते झाले.अध्यक्षस्थानी मा.सौ.शालिनीताई राधाकृष्ण विखे पाटील होत्या.
मान्यवरांची उपस्थिती
या सोहळ्यास ऍड. वसंतराव कापरे, मा. उत्तमराव कदम, श्री. सुभाष पाटील भदगले, सौ. आरती गंगणे, प्रा. डॉ. अभिजित दिवटे, प्रा. डॉ. पांडुरंग गायकवाड, प्रा. सुनील कल्हापुरे, प्रा. आर. के. पडळकर आदी मान्यवर उपस्थित होते.
“विद्यापीठ म्हणून उभारी घ्यावी”
ग्रामीण भागात मेडिकल कॉलेज उभारणे हे मोठे आव्हानात्मक काम आहे. संस्थेने हे कार्य प्रामाणिकपणे सांभाळून गुणवत्तापूर्ण शिक्षणाचा आदर्श निर्माण केला आहे. येत्या काळात ही संस्था विद्यापीठ म्हणून कार्य करावी, अशी अपेक्षा कुलगुरू डॉ. नितीन गंगणे यांनी व्यक्त केली.
मुलींची टॉपर यादीत भर..
गुणवंत विद्यार्थ्यांचा सन्मान करताना “शिक्षणाच्या वटवृक्षाची पायाभरणी करणारे पदमश्री विखे पाटील यांचे दूरदर्शी विचार आजही मार्गदर्शक आहेत. टॉपर यादीत मुलींची भरीव संख्या पाहून अभिमान वाटतो. मी स्वतः प्रवरा पब्लिक स्कूलची माजी विद्यार्थिनी असल्याचा मला सन्मान आहे.” असे अध्यक्षस्थानीय भाषणात सौ. शालिनीताई विखे पाटील यांनी नमूद केले.
सेवाभावी कार्याचा वारसा..
“डॉ. विठ्ठलराव विखे पाटील यांच्या सहवासामुळे जीवनात शिस्त आणि कार्यतत्परता आली. आजच्या पिढीला हे प्रेरणादायी ठरावे,” असे मत संस्थेचे विश्वस्त ऍड.वसंतराव कापरे यांनी व्यक्त केले.
गुणवंतांचा सन्मान व नवीन उपक्रम
सोहळ्यात संस्थेतील गुणवंत विद्यार्थी, डॉक्टर्स व पीएच.डी. प्राप्त शिक्षकांचा सन्मान करण्यात आला. तसेच हिस्टोपॅथ लॅबचे उद्घाटन, कर्मचारी निवास भूमिपूजन आणि कोणशीला अनावरण या उपक्रमांनाही शुभारंभ झाला.
दीपप्रज्वलन, प्रतिमापूजन आणि स्वागतगीताने कार्यक्रमाची सुरुवात झाली. शेवटी मान्यवरांच्या उपस्थितीत विद्यार्थ्यांच्या यशाचा उत्सव सर्वांच्या मनात अभिमानाची छाप सोडून गेला.
कार्यक्रमाचे सूत्र संचालन सौ. विना दिघे यांनी केले तर आभार प्रदर्शन डॉ. सतीश मोरे यांनी केले या प्रसंगी सर्व विभाग प्रमुख, प्राध्यापक, डॉक्टर्स, शिक्षक, स्टाफ, आणि विद्यार्थी मोठ्या संख्येने उपस्थित होते.