समाजाप्रती कृतज्ञतेचा भाव जपत छाया फाउंडेशनचा प्रेरणादायी उपक्रम..

Ahmednagar Breaking News
0

समाजाप्रती कृतज्ञतेचा भाव जपत छाया फाउंडेशन व ठुबे कुटुंब यांचा प्रेरणादायी उपक्रम...

नगर, प्रतिनिधी. (06.फेब्रुवारी. 2026.) : टाकळी काजी येथील श्री.संत गाडगे महाराज प्राथमिक आश्रम शाळा येथे समाजाप्रती कृतज्ञता व्यक्त करणारा एक अत्यंत स्तुत्य आणि प्रेरणादायी उपक्रम राबविण्यात आला. छाया फाउंडेशन सोशल ट्रस्ट व ठुबे कुटुंबीयांच्या वतीने शाळेतील तब्बल शंभर विद्यार्थ्यांना खाऊचे वाटप तसेच स्पोर्ट्स ड्रेसचे वितरण करण्यात आले. या उपक्रमामुळे विद्यार्थ्यांच्या चेहऱ्यावर आनंद झळकला असून शाळेच्या परिसरात उत्साहाचे वातावरण निर्माण झाले.

संत गाडगे महाराज प्राथमिक आश्रम शाळा ही शाळा समाजातील अत्यंत गरीब, वंचित व दुर्लक्षित घटकांतील विद्यार्थ्यांसाठी कार्यरत असून येथे येणाऱ्या विद्यार्थ्यांना पूर्णतः मोफत व विनामूल्य शिक्षण दिले जाते. या शाळेतील बहुतांश विद्यार्थी समाजाच्या तळागाळातून, कठीण आर्थिक परिस्थितीतून आलेले असून अशा विद्यार्थ्यांना शिक्षणासोबत आत्मविश्वास व प्रोत्साहन देण्याच्या दृष्टीने हा उपक्रम अत्यंत महत्त्वाचा ठरला.

हा सामाजिक उपक्रम छाया फाउंडेशनचे अध्यक्ष रितिक ठुबे यांच्या संकल्पनेतून आणि पुढाकारातून राबविण्यात आला. रितिक ठुबे यांनी आयआयटी रुडकी येथून इंजिनिअरिंगचे शिक्षण पूर्ण केलेले आहे. शिक्षणानंतर त्यांनी बेंगळुरू येथे एका नामांकित कंपनीत नोकरी केली. मात्र समाजासाठी काहीतरी देण्याच्या उद्देशाने त्यांनी अलीकडेच नोकरीचा राजीनामा देत ‘सोलारजेन’ या नावाने स्वतःचा सौरऊर्जा व्यवसाय सुरू केला आहे. उद्योगासोबतच सामाजिक बांधिलकी जपत त्यांनी छाया फाउंडेशनच्या माध्यमातून समाजातील शैक्षणिकदृष्ट्या मागासलेल्या, गरीब व अनप्रिव्हिलेज्ड विद्यार्थ्यांसाठी मदतीचा हात पुढे केला आहे.

छाया फाउंडेशन हे नाव त्यांच्या आईच्या नावावरून ठेवण्यात आले असून त्यांच्या आईचे नाव वंदना ठुबे असे आहे. आईकडून मिळालेल्या संस्कारांमुळेच समाजसेवेची प्रेरणा मिळाल्याचे रितिक ठुबे यांनी यावेळी सांगितले. या फाउंडेशनच्या माध्यमातून शिक्षणापासून वंचित राहणाऱ्या, आर्थिकदृष्ट्या दुर्बल व गरजू विद्यार्थ्यांना शिक्षण, सुविधा व संधी उपलब्ध करून देण्याचा संकल्प करण्यात आला आहे.

या उपक्रमात रितिक ठुबे यांचे वडील प्राध्यापक श्री संतोष ठुबे यांचाही मोलाचा सहभाग असून ते न्यू आर्ट्स कॉलेज येथे अ‍ॅनिमेशन विभागाचे विभागप्रमुख म्हणून कार्यरत आहेत. तसेच रितिक ठुबे यांची बहीण नीलम ठुबे या छाया फाउंडेशनच्या उपाध्यक्ष असून त्या देखील ट्रस्टच्या विविध सामाजिक उपक्रमांमध्ये सक्रिय सहभाग घेत आहेत. तसेच या प्रसंगी सहकारी नितीन बिज्जा व रोहित शिंदे देखील उपास्तीत होते. 

या कार्यक्रमप्रसंगी संस्थेचे संचालक विजयराव औटी, मुख्याध्यापक सुरोशे सर, औटी मॅडम, गांगरडे सर तसेच शाळेतील सर्व शिक्षक व कर्मचारी यांनी छाया फाउंडेशन व ठुबे कुटुंबीयांचे मनःपूर्वक आभार मानले. अशा उपक्रमांमुळे विद्यार्थ्यांमध्ये आत्मविश्वास वाढतो, शिक्षणाविषयी सकारात्मक दृष्टीकोन निर्माण होतो आणि समाजात माणुसकीची भावना अधिक बळकट होते, असे मत त्यांनी व्यक्त केले.

या उपक्रमातून एक महत्त्वाचा संदेश समाजासमोर ठेवण्यात आला.

“जीवन म्हणजे केवळ स्वतःसाठी यश मिळवणे नव्हे, तर समाजाच्या उन्नतीसाठी आपल्या क्षमतेनुसार काहीतरी परत देणे होय.”

‘Life is all about giving back’ हा विचार प्रत्यक्ष कृतीतून साकार करत छाया फाउंडेशनने समाजासमोर एक प्रेरणादायी आदर्श निर्माण केला आहे.

Post a Comment

0 Comments
Post a Comment (0)
To Top