जेऊरचे ग्रामदैवत देवी बाईजामाता मंदिर कलश प्रतिष्ठापना सोहळा.
नगर,प्रतिनिधी. (12. फेब्रुवारी.) : जेऊरचे ग्रामदैवत देवी बायजामाता मंदिराच्या शिखर कलश प्रतिष्ठापना व देवीयाग सोहळ्याचे आयोजन करण्यात आले आहे.कार्यक्रमासाठी देवगड येथील महंत भास्करगिरी महाराज उपस्थित राहणारअसून, विविध धार्मिक कार्यक्रम पार पडणार आहेत.
सोहळ्यानिमित्त मंदिर परिसरात मंगळवार 21 फेब्रुवारी पासून चार दिवस विविध धार्मिक कार्यक्रम होणार आहेत. मंगळवारी कलशाची भव्य मिरवणूक काढण्यात येणार आहे. बुधवार दि. 22 रोजी प्रायश्चित्त, शांतीपाठ, प्रधान संकल्प,गणपती पूजन, पुण्याहवाचन,मातृकापूजन, प्रधान देवता,पंचामृत अभिषेक, पिठस्त देवता स्थापना, अग्निस्थापन,ग्रहयज्ञ,महाआरती,प्रसाद, तर गुरुवार दि.23 रोजी शांतीपाठ,प्रात: पूजन,देवता विशेष अभिषेक,देवता अर्चन कर्पूर आरती, शिखर स्नपन प्रयोग, प्रासारीक वास्तू शुद्धीकरण, प्रधानदेवता हवन,मंगल आरती आयोजित करण्यात आलेली आहे.शुक्रवार दि. २४ रोजी प्रात: पूजन, शांतीपाठ, देवता अभिषेक, शिखर प्रतिष्ठापना, कर्म, प्रसाद प्रार्थना,देव भेट,नैवेद्य, पूर्णाहूती,मंगल आरती व हरिजागर असे विविध धार्मिक कार्यक्रम पार पडणार आहेत.याच दिवशी भास्करगिरी महाराज यांच्या उपस्थितीत बाईजामाता मंदिराचे शिखर कलश प्रतिष्ठापना व देवीयाग होणार आहे.तसेच भास्करगिरी महाराजांच्या हस्ते श्रींचे महापूजन,शिखर कलश प्रतिष्ठापना, गर्भगृह संस्कार,प्रवचन,नैवेद्य त्यानंतर महाप्रसादाचे आयोजन करण्यात आलेले आहे.कार्यक्रमाचे पौरोहित्य वेद उपासक गणेश गुरुजी कुलकर्णी,भेंडा राहणार आहेत. कार्यक्रमांचा लाभ घेण्याचे आवाहन मंदिर जीर्णोद्धार समिती, ग्रामस्थ व भक्तगणांच्या वतीने करण्यात आलेले आहे.

